वाघोलीचा वाघेश्वरवाघोलीचा वाघेश्वर
- Viraj Shinde
- Nov 27, 2019
- 1 min read
Updated: Dec 2, 2019
पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून २० कि.मी. अंतरावर वाघोली हे गाव आहे. येथे पुरातन वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे. तसेच पेशवाईतील शूर कर्तबगार सरदार पिलाजीराव जाधवरावांची समाधी आहे.
वाघेश्वर मंदिराची रचना ही चौकोनी गाभारा, सभा मंडप, भिंतीवरील अनेक कोनाडे, शिखराची रचना टप्प्याटप्प्याची खालच्या टप्प्यापेक्षा वरचा टप्पा लहान होत जाणारा. त्यामुळे मंदिराकडे पाहिल्यास आपली नजर सरळ वर न जाता ती आडव्या रेषामध्ये जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरील नंदी मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. नंदी पांढ:या रंगात रंगवलेला आहे. मंदिराच्या बाहेरील प्रत्येक स्तंभाची रचना कलशावर कलश मांडून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या बाहेरील खांबावर दगडी शिल्पामध्ये राम अवतार, बळीवामन, शेषशायी विष्णू, नृसिंह अवतार, वराहअवतार, गरुड देवता, हनुमान, मत्स्य अवतार, कच्छ अवतार, यक्ष, व्याल, महिषाशूरमदिर्नी, मल्ल, व्याल, कल्की अवतार, गणोशमूर्ती, नागदेवता, सहस्त्न भाऊ आणि परशुराम युद्ध , अश्वमेध यज्ञ, घोडा अशा शिल्पकृती दगडावर कोरलेल्या आहेत.
पिलाजी जाधवराव :
पिलाजीरावांनी तलावाच्या शेजारील वाघेश्वर मंदिराजवळ बागेसाठी पेशव्यांकडे जागेची मागणी केली होती. गावातील लोकांना पाण्याची अडचण दूर होण्यासाठी तलाव बांधला. ही मागणी बाजीराव पेशव्यांनी १७२२ मध्ये मान्य करून पिलाजी आणि संभाजी जाधव रावास जमिन दिली. पिलाजीरावांनी दिवेघाटात तलाव बांधला. तो मस्तानी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. दिवेघाटात वर पोहचल्यावर खाली नजर टाकल्यास मोठा पाण्याचा कोरडा तलाव दिसतो हाच तो मस्तानी तलाव. मध्यंतरी पेपरात तलाव साफ करण्याच्या बातम्या झळकल्या होत्या. १७२९ च्या पूर्वी या तलावाची बांधणी पिलाजीरावांनी केली. पुढे बाजीरावांकडे हा तलाव आला.
सरदार पिलाजीराव जाधवांची समाधी
मंदिराशेजारी पाषाणातील सुबक बांधकाम असलेली पिलाजीरावांची समाधी आहेत. या समाधीजवळच जाधवराव घराण्यातील अनेक पुरुषांच्या समाध्या दिसतात.

Comments